अर्थकारण

गुंतवणुकीमागील एक सोपा दृष्टिकोन

‘शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे सट्टा खेळण्यासारखे आहे’ असा एक सुप्त समज आपल्या समाजात खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या गुंतवणुकीबाबत अनेकांच्या मनात साशंकता असते, बरेचजण त्यापासून दूर राहणे पसंत करतात. पण मला वाटते केवळ आयुष्यातील व्यवहाराचे पुरेसे आकलन नसल्यामुळे हा समज जनमानसात पसरलेला आहे. म्हणूनच गुंतवणुकीकडे आज आपण काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या पद्धतीने विचार केल्यास गुंतवणूक ही आपल्याला प्रत्यक्ष नोकरीपेक्षाही अधिक सुरक्षित वाटेल.

एखादा उद्योग-व्यवसाय उभा राहिल्यानंतर जे काम निर्माण होते त्यानिमित्ताने नोकरभरती केली जाते. थोडक्यात नोकरीमुळे उद्योग-व्यवसाय सुरू होत नाही, तर उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यामुळे नोकरी मिळते. जर उद्या उद्योग-व्यवसाय राहिला नाही, तर नोकरीही राहणार नाही. असे असेल तर मग ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये लागलेली नोकरी सुरक्षित आणि ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये केलेली गुंतवणूक असुरक्षित असे कसे होईल? उलट बँक आपल्या सोयीप्रमाणे हवे तेंव्हा एखाद्याला नोकरीवरून काढू शकते, पण बँकेमध्ये केलेली गुंतवणूक काढणे मात्र आपल्याच हातात असते. वर मी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे नाव केवळ उदाहरणादाखल घेतले आहे. शेअर बाजारातील इतर कोणत्याही कंपनीला अगदी हीच गोष्ट लागू पडते.

जोखमीबद्दल बोलायचे झाले, तर एकाच कंपनीमध्ये थोड्या कालावधीसाठी केलेली गुंतवणूक धोकादायक असू शकते, पण एकाचवेळी अनेक कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास हा धोका पूर्णपणे टळू शकतो. त्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. कारण अशाने आपल्या गुंतवणुकीवर तज्ज्ञांची देखरेख राहते, शिवाय कमी रकमेत निरनिराळ्या क्षेत्रातील अनेकानेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते. आपल्याला पगाराप्रमाणे दरमहा काही विशिष्ट रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये हवी असेल, तर आपण ती आपल्या गुंतवणुकीतून नियोजनपूर्वक काढूही शकतो.

सरतेशेवटी जगबुडी झाल्याखेरीज साऱ्या कंपन्या काही एकाचवेळी बंद पडणार नाहीत आणि अशी वेळ आलीच तर सर्व कंपन्या बंद पडल्याने नोकऱ्याही राहणार नाहीत. मुद्दा हा आहे की, एखादी कंपनी अडचणीत आल्यानंतर ती उद्योग बंद करून नोकऱ्या कायम ठेवणार नाही, तर सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची कपात करेल, आणि त्यातूनही मार्ग न मिळाल्यास कालांतराने उद्योग बंद होईल. दुसरे असे की, आपण आपले पैसे खराब कामगिरी करणाऱ्या कंपनीमधून चांगली कामगिरी करणाऱ्या कंपनीमध्ये हवे तेंव्हा वळवू शकतो, त्यामुळे अगदी एखादा उद्योग बंद पडेपर्यंत आपणाला त्यात अडकून राहण्याची देखील आवश्यकता नाही.

नोकरी मिळण्यासाठी आधी उद्योग-व्यवसाय उभा राहावा लागतो आणि उद्योग-व्यवसाय उभा राहण्यासाठी भांडवलाची आवश्यकता पडते. गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण हे भांडवल उभे करण्यास हातभार लावत असाल, तर तो उद्योग आणि पर्यायाने त्यावर अवलंबून नोकऱ्या सुरक्षित राहतील. थोडक्यात नोकरीपेक्षा विचारपूर्वक केलेली गुंतवणूक ही नेहमीच अधिक सुरक्षित असते.