आयुष्य

गाढवाची इतिकर्तव्यपूर्ती!

माणूस आयुष्यभर एखाद्या गाढवाप्रमाणे मनाचे ओझे आपल्या पाठीवर बाळगून फिरत असतो. या मनुष्यरूपी गाढवास आपली पाठ कधी दिसत नाही, त्यामुळे आपण मनाचे निरर्थक ओझे बाळगत आहोत याचा त्यास कधी थांगपत्ता देखील लागत नाही. तो आपला आत्ममग्न होऊन चालत असतो. आयुष्याच्या प्रवासात त्यास भेटेल तो त्याच्या पाठीवर काही ठेऊन मार्गस्थ होतो आणि हा आपला गाढवासारखा काहीच न उमगता बिचकत बिचकत तसाच पुढे जात राहतो.

बालपणास भूतकाळाचा शाप नसतो, तर भविष्यकाळ केवळ स्वप्नात रंगवायचा असतो. म्हातारपणास भूतकाळाशी काही देणेघेणे उरलेले नसते, त्याचवेळी भविष्यकाळाचीही त्याच्याकडून फारशी अपेक्षा नसते. थांगपत्ता नसलेला भूतकाळ आणि अथांग भविष्यकाळ यांमध्ये चाचपडणारा मध्यमवयीन माणूस मात्र मनाच्या ओझ्याखाली सर्वाधिक पिचलेला असतो. तो आपला उसने अवसान आणून स्वतःचीच कीव करत यथाशक्ती चालत राहतो. याचवेळी आपल्या पोरा-बाळांच्या पाठीवर भाबडेपणाने नकळत हळूहळू एक-एक करून ओझे द्यायला तो अजिबात विसरत नाही! आयुष्यभर गाढवाचे ओझे वाहायचा आपण आपल्या मुलांकडून कसा सराव करून घेतला! याचा उर फाटेस्तोवर अभिमान बाळगण्यातच त्याला आपल्या गाढवरूपी आयुष्याची इतिकर्तव्यपूर्ती हवी असते!