तंत्रज्ञान

किंडल : वाचनाची नवी अनुभूती

एखाद्या वस्तूची आपल्याला खरेच गरज आहे किंवा नाही? हे आपल्याला ठाऊक नसते, तेंव्हा ती वस्तू अशावेळी विकत घ्यावी जेंव्हा तिची किंमत खूप जास्त उतरलेली असते. ऑनलाईन शॉपिंग साईटवर पुन्हा एकदा ‘डेज्’ सुरू झाले, तेंव्हा यावेळी कोणतीही वस्तू विकत घ्यायची नाही असे मी ठरवले होते, पण ‘किंडल पेपरव्हाईट‘ केवळ ~६५०० रुपयांना मिळत असताना मला ही सवलत सोडता आली नाही. बऱ्याच काळापासून मला किंडल डिव्हाईस हवे होते, पण स्मार्टफोन आणि टॅबवर किंडलवरील पुस्तके वाचता येत असताना पुन्हा खास त्यासाठी वेगळे उपकरण घेण्याची खरंच गरज आहे का? याबद्दल माझ्या मनात शंका होती. थोडक्यात मला किंडल घेऊन पहायचे तर होते, पण मला त्याची गरजही वाटत नव्हती.

किंडल पेपरव्हाईट
किंडल पेपरव्हाईट

पेपरव्हाईट सुरू केल्यानंतर ‘या लॅग होणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्लेसाठी आपण का पैसे मोजले असतील!’ असे क्षणभर मला वाटले देखील, पण काही वेळातच त्याचे वेगळेपण खऱ्या अर्थाने माझ्या लक्षात येऊ लागले. किंडलमध्ये ज्या प्रकाराचा डिस्प्ले वापरला जातो, त्यास इ-इंक डिस्प्ले म्हणतात. हा लेख सोपा राहावा यासाठी इ-इंक डिस्प्लेमागील तंत्रज्ञानात मी शिरणार नाही, मात्र या उपकरणाचा ओघवता अनुभव इथे मांडणार आहे.

किंडल पेपरव्हाईट - पुस्तकसंग्रह
किंडल पेपरव्हाईट – पुस्तकसंग्रह

किंडल पेपरव्हाईट हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम लक्षात येते ती या उपकरणाची दर्जेदार बांधणी आणि वजनाला असलेला हलकेपणा. स्क्रीनला स्पर्श केल्यावर ती आपल्या स्मार्टफोनप्रमाणे सुळसुळीत जाणवत नाही, तर एखाद्या कागदाप्रमाणे किंचित खरबरीत भासते. संपूर्ण उपकरणावर खालील बाजूस केवळ एकच बटन आहे, ज्याने हे उपकरण सुरू करता येते. किंडल सोबत एक काळ्या रंगाची युएसबी केबल मिळते. लॅपटॉप वा पॉवर बँकला युएसबी केबल जोडून आपण किंडल चार्ज करू शकतो. इ-इंक डिस्प्लेला काम करण्यासाठी खूप कमी विद्युतभार लागत असल्याने एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर पुढील काही आठवडे हे उपकरण पुन्हा चार्ज करावे लागत नाही. केवळ स्क्रीनवरील मजकूर बदलतो, तेंव्हाच यातील विद्युतऊर्जेचा वापर होतो.

किंडल पेपरव्हाईट - पुस्तक वाचन
किंडल पेपरव्हाईट – पुस्तक वाचन

पेपरव्हाईटमध्ये एलईडी बॅकलाईट असल्याने अंधारातही आपणाला त्यावरील पुस्तके वाचता येतात, पण किंडलच्या मूलभूत उपकरणावर मात्र बॅकलाईट अभावी अंधारात वाचणे शक्य होत नाही. किंडल मधील इ-इंक डिस्प्लेचा डोळ्यांवर ताण येत नसल्याने दीर्घकाळ वाचनासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. पेपरव्हाईटची स्क्रीन ग्लेअर फ्री आहे. इतर सर्वसाधारण स्क्रीनप्रमाणे ती दिवसाच्या प्रकाशात परावर्तित होत नाही. अशाने विपुस्तक वाचण्याचा अनुभव आणखी दिलासादायक होतो.

किंडलची स्क्रीन वरकरणी सर्वसाधारण वाटत असली, तरी वरील काही खास वैशिष्ट्यांमुळे विपुस्तक वाचण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरते. कदाचित त्यामुळेच या उपकरणाची किंमत टॅब व स्मार्टफोनच्या तुलनेत काहीशी अधिक जाणवते. सरतेशेवटी थोडक्यात सांगायचे, तर जे अनियमित वाचक आहेत, त्यांना या उपकरणाची फारशी गरज नाही, पण जे नियमितपणे पुस्तके वाचतात, त्यांनी किंडल घेण्यास हरकत नाही. या उपकरणामुळे आपणाला निश्चितपणे वाचनाची एक नवी अनुभूती मिळेल!