सामाजिक

कालबाह्य शेती

माणूस पृथ्विवरील निसर्गाला हळूहळू वशीभूत करु लागला आहे. तेंव्हा पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारा शेती हा व्यवसाय आता कालबाह्य होताना दिसत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे मानवास सुखासाठी निसर्गाच्या कृपेवर अवलंबून रहावे लागणार नाही.

उद्या माणसाचं पारंपारिक शेतवरील अवलंबत्त्व हे संपणारच आहे, आज केवळ त्या दिशेने एक हलकीशी सुरुवात झालेली आहे. हे अवलंबत्त्व जरी संपू लागले असले, तरी हा स्थित्यांतराचा काळ असल्याने पर्यायी व्यवस्था पुरती निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यास हे स्थित्यांतर जड जात आहे. पण शेतकर्‍याने या अवघड प्रसंगी थोडासा धीर धरावा. पारंपारिक शेतीवरील अवलंबत्त्व संपणं हे भावनिकदृष्ट्या जरी दुःखद वाटत असलं, तरी ते त्याच्यासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी चांगलंच आहे. कालपरत्त्वे पारंपारिक शेतीला पर्यायी व्यवस्था सक्षमपणे उभी राहिल, त्यावेळी शेतकरीही आपल्या जीवनात आनंद प्राप्त करेल. पण त्यावेळी तो स्वतः केवळ नाममात्र शेतकरी असेल व त्याच्या पुढील पिढ्या एखादा दुसरा व्यवसाय करत असतील.

लोकसंख्या वाढल्याने एकेका शेतकर्‍याजवळील शेतजमीन आता कमी होत चालली आहे. म्हणूनच आजच्या काळास अनुसरुन यंत्रद्वारे शेती करणं देखील अवघड बनलं आहे. पण भविष्याचा विचार केला असता हा प्रवास सुसंगत असाच दिसतो. मला वाटतं पुढे जाऊन सरकारच्या देखरेखीखाली खाजगी कंपन्या भाडेतत्त्वावर शेतकर्‍यांकडून शेतजमिनी घेतील आणि मग मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरुन आभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने शेती करतील. ते मोठ्या कौशल्याने व कार्यक्षमतेने शेतीची उत्पादकता वाढवतील. त्यामुळे शेतमालाचा दर्जा तर सुधारेलच, पण तो शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत रास्त किमतीत पोहचेल. सरकारने आपले काम चोख बजावले, तर यात शेतकर्‍याचाही चांगला फायदा होईल.

आज शेतकरी ज्या दुःखातून जात आहेत, त्यास सरकार तर जबाबदार आहेच! पण हा एक स्थित्यांतराचा देखील भाग आहे. बदलत्या परिस्थितीनुसार शेतकर्‍यास विचार व प्रशिक्षण दिणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शेतकर्‍यांचं शेतीवरील अवलंबत्त्व कमी करुन पर्यायी व्यवस्था ही लवकरात लवकर उभी करायला हवी. पारंपारिक शेती ही आता कालबाह्य होणार असली, तरी शेतकर्‍यांनी काळजी करण्याचे काही एक कारण नाही! कारण शेतकर्‍यांची मुले आता शाळा-कॉलेजात जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत आहेत. ही मुले काळसुसंगत व्यवसाय करुन सर्वार्थाने अधिक समृद्ध होतील याबाबत मला पूर्णतः खात्री आहे.

अखेर शेतकर्‍याची आपल्या व्यवसायात असलेली भावनिक गुंतवणूक मी समजू शकतो, पण ‘कालाय तस्मै नमः’ म्हणण्याखेरीज आपल्या हातात असतं तरी काय!?