आयुष्य · सामाजिक

कामामधून कार्याकडे

मानवी आयुष्य अगदी तकलादू आहे. एरव्ही सारे काही सुरुळीत सुरु असताना ही गोष्ट ध्यानातही येत नाही, परंतु आयुष्यात जेंव्हा एखादा प्रसंग चालून येतो, तेंव्हा आयुष्याच्या तकलादूपणाची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. प्रत्येकाची वेळ निरनिराळी असल्याने आयुष्याचे गांभीर्य सामूहिकपणे जाणवत नाही, परंतु मानवी जीवनात मात्र ते सुप्तपणे वावरत असते. या भानातूनच दुसर्‍याप्रति जबाबदारीची एक सखोल भावना मानवी अंतःकरणात रुजू लागते. अशाने प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती माणसात दिसून येते. मानवाच्या माणूस म्हणून होत असलेल्या जडणघडणीमध्ये सहकार्याची भावना मोलाची आहे. आजवर वेळेला हात देऊनच मानवी समाजाने आपला उत्कर्ष साधलेला आहे.

आयुष्याचा अन्वयार्थ लावत असताना आपण स्वतःपलिकडे इतरांशी जोडले गेलेलो आहोत ही गोष्ट विसरुन चालत नाही. यालाच आपण ‘जबाबदारी’ असेही म्हणू शकतो. आपली जबाबदारी ओळखण्यात आणि ती पार पाडण्यात एक वेगळाच आनंद दडलेला असतो. दैनंदिन आयुष्यात केवळ मानवी नात्यांमधून नव्हे, तर माणूसकीच्या नात्यांमधूनही असा निखळ आनंद वहात असतो. हा आनंद ज्यास खर्‍या अर्थाने ओळखता येतो त्याचे व्यक्तिगत आयुष्य सत्कारणी लागते, त्याच्या आयुष्यास एक दिशा प्राप्त होते.

दुसर्‍यासाठी जगणे हेच स्वतःसाठी जगणे आहे याची अनुभूती माणसाला स्वतःपलिकडे घेऊन जाते. त्यासाठी फार काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही. आपले काम प्रामाणिकपणे करत असताना त्यात आपल्यापरीने सुधारणा करुन भर घातली तरी पुरेसे आहे. आपल्या दैनंदिन कामातून माणूस जेंव्हा सामाजिक उत्कर्षास हातभार लावतो, तेंव्हा ते काम केवळ काम न राहता एक कार्य बनते. कामातून कार्याकडे होणार्‍या या प्रवासातच आयुष्य दडले आहे.