व्यक्तिगत

कचर्‍याची फळे

मागचा लेख जिथे संपला तिथूनच आज पुढे लिहायला सुरुवात करतो. पण दोनही लेख तसे परस्परांवर अवलंबून नसल्याने त्यांस एकच शिर्षक दिलेले नाही.

लॅपटॉपची बॅटरी घेतल्यानंतर आम्ही आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जायला निघलो. त्याच्याकडे जाण्यापूर्वी आम्ही मस्तानी पिण्यासाठी थांबलो. तो पैज हरला असल्याने मस्तानीचे पैसेही तोच देणार होता. दहा दिवसांपूर्वी त्याने मला फोन केला, तेंव्हा पावसाचे काही एक चिन्ह दिसत नव्हते. पण मी भविष्यवाणी केली की, ‘येत्या बुधवारी पाऊस पडणार आहे’. त्यास ते काही खरे वाटले नाही. तेंव्हा मी त्यास हवामानाचा अंदाज पाहिला असल्याचे अगदी प्रामाणिकपणे सांगितले. पण त्याचा हवामान खात्यावरही विश्वास नव्हता. तेंव्हा मी अगदी सहज म्हणून त्याच्यासोबत पैज लावली की, जर पाऊस पडला, तर तू मला मस्तानी द्यायचीस आणि नाही पडला तर मी देणार! अपेक्षेप्रमाणे बुधवारी पाऊस झाला! तेंव्हा आजकाल हवामानाचे अंदाज हे अगदी पैज लावण्याइतपत अचूक असतात असं म्हणायला काही हरकत नाही!

माझ्यासाठी पायनापल आणि त्याच्यासाठी पिस्ता असे दोन प्याले त्याने आमच्यासमोर ठेवले. पण त्यापैकी पायनापल कोणता? आणि पिस्ता कोणता? .. ‘मला माहित आहे’ अशा आत्मविश्वासाने मी त्यातला एक प्याला हातात घेतला आणि मस्तानी पिण्यास सुरुवात केली. तेंव्हा मला समजले की, मी पायनापल समजून पिस्ता फ्लेवर निवडला आहे. मला पिस्ता नको होता..! तेंव्हा हवामानाचा अंदाज अचूक ठरला असला, तरी मस्तानीचा अंदाज मात्र चुकला.. आणि पैज जिंकूनही न जिंकल्यात जमा झाली.

त्या दुसर्‍या मित्राच्या घराजवळ पोहचल्यानंतर मित्राने त्यास फोन करुन बोलावले. तो येण्याची वाट पहात असताना त्याने एका झाडाकडे माझे लक्ष वेधले. एका अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या त्या झाडावर कचर्‍याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मोठ्या दिमाखात लोंबकाळत होत्या. त्या झाडाखाली तर कचरा होताच.. पण तिथल्या रहिवाशांनी अगदी झाडाच्या फांद्यांनाही सोडले नव्हते. जणूकाही त्या झाडास कचर्‍याची फळे आली होती.. जी पुढेमागे आपल्यालाच भोगावी लागणार आहेत.

काही वेळातच तो दुसरा मित्र आमच्यापाशी आला. करिअर व चेष्टामस्करी हाच गप्पांचा मुख्यतः विषय होता. हा मागील चार महिन्यांपासून एके ठिकाणी नोकरी करतो. तो सकाळी ८ ला घरातून निघतो ते रात्री ९ लाच परत येतो. पण त्यास पगार काही मिळत नाही. तरीदेखील तो रोज आपल्या कामावर रुजू होतो. पैसे भरा.. थोडं प्रशिक्षण घ्या.. मग हमखास नोकरी! अशा योजनेतून यास नोकरी मिळाली आहे. नोकरीदरम्यान वरिष्ठ लोक कंपनीतील मुलांचा मानसिक छळ करतात. जेणेकरुन यांनी नोकरी सोडून द्यावी व त्यांस त्या मुलांच्या जागी त्या योजनेतून बाहेर पडणार्‍या नवीन मुलांची नेमणूक करता यावी. तेंव्हा मग पगार देण्याचा काही प्रश्नच नाही! हे अगदी स्वतःच मालकास पगार देऊन त्याच्याकडे नोकरी करण्यासारखं आहे! त्यातून मिळणार काय? तर अनुभव! पण नक्की कसला अनुभव?

इतक्या नेटाने नोकरी करणार्‍या मुलांचे प्रेरणास्त्रोत हे माझ्या आकलनशक्ती पलीकडेचे आहे. ‘तेथे कर माझे जुळती’, इतकंच काय ते मी या मुलांकडे पाहून म्हणू शकतो. यांच्या शारीरिक व मानसिक शक्तिचं कौतुक करावं ते थोडंच! हा पहिला मित्रही रोज ९ ते ९ काम करतो. त्यास रात्री ९ नंतर फोन केला असता, पलिकडून केवळ एक मरगळलेला आवाज ऐकू येतो.

‘तुला या कामाची आवड आहे? तू ही नोकरी सोडून का देत नाहीस?’, मी त्याला विचारलं. तेंव्हा मला समजलं की, शाळेत असताना त्यास मुळात चित्रकलेची आवड होती. पण सामाजिक प्रवाहात त्याने आपली ही आवड स्वतःहून दूर्लक्षित केली. आता लग्नाचं वय झालं आहे.. उशीर झाला आहे. तेंव्हा पुन्हा ती कलेची वाट चोखाळणंही शक्य नाही. तसं वातावरणही नाही. तो जे करत आहे, त्याची आवड नाही. त्यामुळे त्या विषयाचं पुरेसं ज्ञान नाही. ज्ञान नसल्याने दुसरीकडे जाऊन मुलाखत देण्याचा आत्मविश्वास नाही.. आणि अशा दुष्टचक्रात अडकल्याने एकंदरीतच जीवनात वावरत असताना त्याचा स्वतःवर विश्वास उरलेला नाही. तेंव्हा सध्या तो केवळ दिवसाची चालढकल करत आहे. यावर ‘सकारात्मक विचार कर! ..नोकरी बदल..’ इतकंच काय ते मी त्यास सांगू शकलो.

या दुसर्‍या मित्राला निरोप देऊन मी पहिल्या मित्राच्या ऑफिसमधील मित्रांना भेटण्यासाठी त्याच्या घराकडे निघालो. रस्त्यावर ‘बुगडी माझी सांडली गं’ या चित्रापटाचे पोस्टर लागले होते. तेंव्हा ‘असला चित्रपट कोणी बघेल का!?’ या अर्थाने मी मजेने त्यास म्हटलं की, ‘हा’ मुव्ही पहायला जायचं का? यावर आश्चर्य म्हणजे त्याने रात्री त्या चित्रपटास जायचे निश्चित केले. पुन्हा काही आमची भेट झाली नाही.. पण मराठी चित्रपट निर्मात्यांना मला इतकंच सांगायचं आहे की, काळजी करु नका.. तुमच्या चित्रपटांना केवळ अनुदानच नाही.. तर प्रेक्षकही आहेत.

त्याच्या ऑफिसमधील मित्र हे त्याच्या घराजवळील एका बस स्टॉपवर त्याची वाट पहात होते. तिथून ते एका मॉलमध्ये फिरायला जाणार होते. त्याने त्याच्या ऑफिसमधील मित्रांशी माझी ओळख करुन दिली. हे नवीन मित्र झाल्यापासून तो काही मला फारसा रिकामा सापडत नाही.. यावरुन आज दिवसभरात मी त्याची बरीच चेष्टा केली होती. काहीवेळ त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मी घरी परत आलो.

‘अनुदिनी’ या ब्लॉगच्या सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!