म्युच्युअल फंड

इक्विटी म्युच्युअल फंडचे १० उपप्रकार

कोणतीही ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ अर्थात ‘एएमसी’ (म्युच्युअल फंड कंपनी) जेंव्हा म्युच्युअल फंड योजना तयार करत असते, तेंव्हा ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘सेबी’ने आखून दिलेल्या काही मानकांचे तिला पालन करावे लागते. निरनिराळ्या एएमसी’च्या समान प्रकारच्या योजनांमध्ये सुसूत्रता यावी हा त्यामागील उद्देश असतो. अशाने गुंतवणूकदाराला स्वतःसाठी योग्य योजना निवडणे सोपे जाते. ‘सेबी’ने इक्विटी प्रकारात मोडणाऱ्या योजनांची एकूण १० उपप्रकारांत वर्गवारी केली आहे. हे १० उपप्रकार कोणते? ते आपण या लेखात पाहणार आहोत. तत्पूर्वी म्युच्युअल फंडचे मुख्य प्रकार कोणते? आणि लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप म्हणजे काय? हे वाचणे उपयुक्त ठरेल.

इक्विटी फंडचे १० उपप्रकार

१. मल्टि कॅप फंड : मल्टी कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ६५% रक्कम ही लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.

२. लार्ज कॅप फंड : लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ८० रक्कम शेअर बाजारातील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.

३. लार्ज अँड मिड कॅप फंड : लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ३५% रक्कम लार्ज कॅप कंपन्यांत आणि कमीतकमी ३५% रक्कम मिड कॅप कंपन्यांत गुंतवली जाते.

४. मिड कॅप फंड : मिड कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ६५% रक्कम मिड कॅप प्रकारात मोडणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवली जाते.

५. स्मॉल कॅप फंड : स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी कमीतकमी ६५% रक्कम स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवावी लागते.

६. डिव्हिडंड ईल्ड फंड : ज्या स्टॉक्सची डिव्हिडंड ईल्ड चांगली आहे, त्यात अशाप्रकारच्या फंडमधील कमीतकमी ६५% रक्कम गुंतवली जाते.

७. व्हॅल्यू फंड : रास्त दराने मिळणारे स्टॉक्स ज्यांचे भविष्यात मोल वाढू शकते, त्यांमध्ये व्हॅल्यू फंडची कमीतकमी ६५% गुंतवणूक केली जाते.
काँट्रा फंड : बाजारात गुंतवणूकीसंदर्भात जे चलन (trend) सुरू आहे त्याच्या विरुद्ध दिशेने काँट्रा फंडमधील कमीतकमी ६५% गुंतवणूक केली जाते, जेणेकरून भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल.
नोंद : एएमसी (म्युच्युअल फंड कंपनी) योजना तयार करत असताना व्हॅल्यू किंवा काँट्रा फंड यांपैकी एका उपप्रकाराची निवड करू शकते.

८. फोकस्ड फंड : फोकस्ड फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकीसंदर्भात विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मर्यादित (कमीतकमी ३०) स्टॉक्समध्ये कमीतकमी ६५% गुंतवणूक केली जाते.

९. सेक्टोरल / थिमॅटिक : अशाप्रकारच्या फंडमधील एकूण गुंतवणूकीच्या कमीतकमी ८०% रक्कम विशिष्ट क्षेत्राशी किंवा संकल्पनेशी निगडित स्टॉक्समध्ये केली जाते.

१०. इएलएसएस : प्राप्तिकरावर सूट मिळवण्यासाठी इएलएसएस’मध्ये गुंतवणूक केली जाते. यात एकूण गुंतवणुकीपैकी कमीतकमी ८०% रक्कम इक्विटी व इक्विटीशी निगडित साधनांमध्ये करावी लागते. इएलएसएस मध्ये एकदा केलेली गुंतवणूक पुढे ३ वर्षांसाठी काढता येत नाही.

प्रत्येक एएमसी (म्युच्युअल फंड कंपनी) वरील उपप्रकारांत प्रत्येकी केवळ एक योजना सुरू करू शकते. इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असताना वरील उपप्रकारांमुळे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीशी निगडित योग्य निर्णय घेणे सोपे जाते.