आयुष्य

आपल्यातील परकेपणा

आपल्यातील परकेपणा ही या जगातील एक मोठी शोकांतिकाच नव्हे, तर मानवाला लाभलेला शाप आहे! आपलाच आपल्यासाठी परका असेल, तर मग परका तो कोण ओळखावा!? आणि आयुष्याच्या नाजूक प्रवासात विश्वासाचा धागा तो काय मानावा!? व्यक्तीच्या मनापासून कुटुंबातील सदस्यांपर्यंत, लहानश्या खेड्यापासून संपूर्ण देशापर्यंत सर्वत्र आपल्यातील परकेपणा दिसून येतो. अनेकदा हा परकेपणा उघड नसतो, पण त्यातून निर्माण झालेली  निराधार रिकामेपणाची सल मात्र मानवी मनास आतून कणा-कणाने पोखरत असते. जेंव्हा आपल्याला आधाराची गरज असेल, तेंव्हा आपला आपला नसेल ही बाब माणसाच्या जिव्हारी लागलेली असते.

आपला अडचणीत असताना त्याच्या उद्विग्नतेचा सुप्त असुरी आनंद लुटणे ही काही माणसांसाठी आयुष्यातील एक मौज असते. त्यास्तव आपला अडचणीत यावा अशी सुप्त इच्छा ते मनोमन सातत्याने बाळगून असतात. आपला जर आपल्याशिवाय आनंदी असेल, सुखात असेल, तर अशा माणसांच्या मनाची लगेच चलबिचल सुरू होते. त्यासाठी ते प्रसंगी आपल्यांचे खच्चीकरण सुरू करतात. दुर्देवाने अशाप्रकारे आपल्यातील परकेपणा कधी कधी संवेदनशील माणसाच्या मनात रुजतो नि त्याचे स्वतःचे मनच त्यास परकेपणाने छळू लागते. माणसाचे मनच जेंव्हा त्याच्यासाठी परके होते, तेंव्हा त्यास परके तरी कोण असावे!?

आपल्यातील परकेपणा हा अनादी-अनंत काळापासून चालत आलेला आहे आणि तो एव्हढ्यात जगातून अदृष्य होईल असे दिसतही नाही. पण माणसातील प्रमाणिकपणास जर आत्मविश्वासपूर्ण स्पष्टोक्तीची जोड मिळाली, तर मात्र या गोष्टीवर नक्कीच काही प्रमाणात उतारा मिळू शकेल.