म्युच्युअल फंड

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड

फेसबुक, अमेझॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची यशोगाथा अनेकांना प्रभावित करत असते. त्यामुळे या कंपन्यांच्या दैदीप्यमान वाटचालीत कुठेतरी सहभागी होता यावे असे एखाद्याला वाटू शकते, परंतु त्यासाठीचा सहजसोपा मार्ग मात्र त्यास ठाऊक असतोच असे नाही. अशावेळी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा पर्याय कामी येऊ शकतो. कारण म्युच्युअल फंडद्वारे आपणाला केवळ भारतीय शेअर बाजारात नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांतही गुंतवणूक करता येते.

म्युच्युअल फंडच्या आंतरराष्ट्रीय योजना निरनिराळ्या प्रकारांत उपलब्ध असतात. काही योजना विशिष्ट देशातील कंपन्यांमध्ये सहसा अप्रत्यक्ष गुंतवणूक करतात, तर काही योजना या विशिष्ट संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून त्या संकल्पनेशी निगडित जगभरातील निरनिराळ्या कंपन्यांमध्ये आपले पैसे सहसा अप्रत्यक्षरीत्या गुंतवतात. ‘अप्रत्यक्ष’ अशासाठी की, या योजना थेट परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाहीत, तर परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या इतर म्युच्युअल फंड योजनांमध्ये त्या गुंतवणूक करतात. यास ‘फंड ऑफ फंडस्’ असे म्हणतात. उदाहरण संगायचे झाले, तर DSP World Mining Fundद्वारे परदेशातील खनिजसंपत्तीशी निगडित म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. दुसरीकडे Kotak US Equity Fundच्या माध्यमातून अमेरिकेतील शेअर बाजाराशी निगडीत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. ‘फंड ऑफ फंडस्’मुळे विविधीकरण (Diversification) अधिक प्रमाणात होत असल्याने गुंतवणुकीला थोडेफार स्थैर्य प्राप्त होत असले, तरी अशाने फंड सांभाळण्याच्या खर्चातही (TER – Total Expense Ratio) काहीशी वाढ होते.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने आपला काही विशेष फायदा होतो का? ही गोष्ट परिस्थितीवर अवलंबून असली, तरी ढोबळमानाने या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. भारत सध्या विकसनशील अवस्थेत आहे. त्यामुळे जे प्रदेश पूर्वीपासूनच प्रगत आहेत त्यांच्यापेक्षा भारतातील प्रगतीचा दर हा तुलनेने अधिक आहे, शिवाय भारताचे आर्थिक भवितव्यही सुरक्षित व आश्वासक आहे. याच कारणाने परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. परिणामी इथल्या शेअर बाजारावर परदेशी गुंतवणुकीचा मोठा प्रभाव दिसून येतो.

मग आंतरराष्ट्रीय फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा उपयोग काय? मुळातच याप्रकारच्या फंडमध्ये तुलनेने खूप कमी गुंतवणूक झालेली पाहायला मिळते. तरी आपल्या गुंतवणुकीचे विविधीकरण करत असताना अशा फंडचा आपणास फायदा होऊ शकतो. कारण भारतीय बाजार कोसळत असताना, अमेरिकेतील बाजारही कोसळत असेल असे नाही. शिवाय आंतरराष्ट्रीय फंडना रुपयाच्या अवमूल्यनाचा देखील फायदा होतो. त्यामुळे आपल्या एकंदर गुंतवणुकीला या माध्यमातून थोडीशी सुरक्षितता प्राप्त होऊ शकते. शेवटी थोडक्यात सांगायचे तर अल्पमुदतीत आंतरराष्ट्रीय फंडमुळे आपला चांगला नफा होऊ शकतो, परंतु दिर्घमुदतीत मात्र हे फंड नेहमीच्या फंडपेक्षा अधिक परतावा देतात अशातला भाग नाही.