समिक्षा

अन्‌नोन – चित्रपट

लिआम निसन हा ‘अन्‌नोन’ या नावाप्रमाणेच रहस्यमयी अशा चित्रपटाचा नायक असून, त्याचा ‘टेकन’ हा सिनेमा मी यापूर्वी पाहिला आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट नक्कीच वाईट नसणार याची मला खात्री होती. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाच्या कथेत रहस्य असून, ही कथा आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ‘टेकन’ चित्रापटात लिआम निसन याने आपल्या मुलीची काळजी असलेल्या एका जबाबदार पित्याची भुमिका बजावली आहे. आपल्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजंसिच्या’ कारकिर्दित गुन्हेगारांशी दोन हात करण्यासाठी तो जी काही बोद्धिक आणि शारिरीक अशी कौशेल्ये शिकलेला असतो, त्याचा उपयोग पुढे तो आपल्या मुलीला ओलिस ठेवणार्‍यांचा नायनाट करुन तिला सोडवून आणण्यासाठी करतो. ‘अन्‌नोन’ चित्रपटात मात्र त्याची भूमिका ही फार ‘शूरवीर’ अशी नसली, तरी ती कथेला सुसंगत अशीच आहे. ‘टेक्निक’ हे ‘टेकन’ या चित्रपटाचं बलस्थान होतं, तर ‘रहस्य’ हे ‘अन्‌नोन’ या चित्रपटाचं बलस्थान आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीला एक बायोकेमिस्ट आणि त्याची पत्नी ‘बर्लिन’ च्या विमानतळावर उतरतात. त्यांना एका परिषदेत सहभागी व्हायचं असतं, जिथे एक बायोटेक्नॉलॉजी मधला शास्त्रज्ञ आणि त्याचा अरब फायनान्सर एका शोधाची घोषणा करणार असतात. तो आणि त्याची पत्नी विमानतळावरुन हॉटेलवर पोहचतात. त्याची पत्नी हॉटेल मध्ये काऊंटरवर आपण बुक केलेल्या रुम बाबत चौकशी करण्यासाठी जाते, आणि हा बाहेर टॅक्समधून आपलं सामान बाहेर काढू लागतो. तेंव्हा त्याच्या लक्षात येतं की, आपण आपली एक बॅग ही विमानतळावर अनवधानाने विसरलो असून, ती आपण ताबडतोब परत आणायला हवी. तिथल्या डोअरकिपरला त्याबाबत सांगून हा बाहेरच्या बाहेर पटकन एक टॅक्सी पकडतो आणि विमानतळाच्या दिशेने निघतो. रस्त्यात ट्रॅफिक जॅम असते. आपलं महत्त्वाचं सामान विमानतळावर विसरल्याने तो अस्वस्थ असतो. तो ड्रायव्हरला (डायान क्रुगर – ‘नॅशनल ट्रेझर’ मधील नायिका ) दुसरा एखादा रस्ता पकडण्यास सांगतो. त्यांची टॅक्सी दुसर्‍या रस्त्यावरुन धावू लागते. इतक्यात समोरच्या ट्रकमधून बर्फाच्या लाद्या रस्त्यावर कोसळतात आणि त्यातून झालेल्या अपघातात यांची टॅक्सी पुलाखालून वाहणार्‍या थंडगार नदीत कोसळते. नायिका (टॅक्सी ड्रायव्हर) कसंबसं त्याला वाचवून नदीकाठी आणते. पण जसं पोलिस घटनास्थळी पोहचतात, ती तिथून काढता पाय घेते.

नायक हॉस्पिटलमध्ये असतो. तो मागील तीन दिवसांपासून कोमामध्ये असल्याचं त्याला सांगितलं जातं. त्याला हळूहळू सगळं लक्षात यायला लागतं. तो म्हणतो, मला इथून निघायलाच हवं. माझ्या पत्नीसाठी हा देश अनोळखी आहे. ती बाहेर माझी वाट पहात असेल. पूर्णपणे बरा झालेला नसतानाही तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर पडतो. डॉक्टर त्याला नाईलाजाने परवानगी देतात. तीन दिवस झाले तरी त्याचा शोध त्याची पत्नी का घेत नाही? याबाबतही आपण विचार करत राहतो. ते ज्या हॉटेलमध्ये उतरणार होते, त्या हॉटेलमध्ये तो पोहचतो. तिथे एका पार्टित त्याला त्याची पत्नी दिसते. तो तिच्याजवळ पोहचतो, पण ती त्याला ओळखण्यास स्पष्ट नकार देते आणि आपला पती आपल्या सोबत असल्याचं सांगते.  त्याचे नावही तेच असते, जे याचे असते, आणि तो कामही तेच करत असतो, जो हा करत असतो. केवळ चेहरा बदललेला असतो. हे असं असतं जसं, उद्या कोणीतरी आपलं आयुष्य चोरावं आणि आपल्याला तिथून बेदखल करुन द्यावं. नायक पुरता गोंधळून जातो. आपली पत्नी आपल्या सोबत अशी का वागत आहे? त्याला अपघाताआधीचे आपल्या पत्नीसोबतचे खाजगी प्रसंग तुटक तुटक आठवत असतात. आणि त्याला खात्री असते, की हीच आपली पत्नी आहे. मग ही आपल्या बरोबर असं का वागत आहे? आपली ओळख पटवून द्यावी असा कोणताही पुरावा त्याच्याजवळ नसतो. त्याचे पासपोर्ट त्या विसरलेल्या बॅगमध्ये असते, आणि इंटरनेटवर जेंव्हा त्याच्या नावाचा सुरक्षारक्षकांकडून शोध घेतला जातो, तेंव्हा तेथेही त्याचा बदललेला चेहराच आढळून येतो. आता मात्र तो पुरता गोंधळून जातो. आपला अपघात झाला होता आणि आपल्याला डॉक्टरांची गरज असल्याचं सांगून तो हॉटेलच्या सुरक्षारक्षकांपासून सुटका करुन घेतो. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की, एक अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करत आहे. तो कसाबसा त्या व्यक्तिपासून आपली सुटका करुन घेतो आणि हॉस्पिटलमध्ये पोहचतो. तिथे त्याच्यावर इलाज चालू असताना, एक नर्स एका माणसाचा पत्ता गुपचूप त्याच्या हातामध्ये देते. या माणसाच्या मदतीने तो त्याची स्वतःची ओळख पटवून देऊ शकेल, असं ती त्याला सांगते. इतक्यात तो पाठलाग करणारा मनुष्य याला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचतो आणि तो त्या नर्स आणि डॉक्टरनाही मारतो. नायक पुन्हा एकदा कशीबशी आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी होतो. तो हॉस्पिटलमधून पळ काढतो.

दरम्यान त्याने त्या दिवशी टॅक्सी चालवणार्‍या मुलीला शोधून काढलेलं असतं. ती जर्मनीमध्ये अनधिकृतरीत्या रहात असल्याने, त्या दिवशी अपघातानंतर तिने त्या तिथून पळ काढल्याचं त्याला समजतं. ती अपघाताआधीच्या प्रसंगाबाबत काही जाणत असेल, तर त्याला त्याबाबत तिची मदत हवी असते. पण तिला यामध्ये पडायचं नसतं. तो तिथून निघून येतो. नर्सने दिलेल्या पत्यावर पोहचल्यानंतर तिथे त्याला एक पूर्व जर्मनीचा निवृत्त गुप्तहेर भेटतो. जीवनात काही उद्दिष्ट उरलं नसल्याने हौसेखातर तो त्याला मदत करण्याचं मान्य कारतो आणि त्याची ओळख पटवून देण्याकरीता पुरावे गोळा करण्याच्या कामाला लागतो. तो त्या टॅक्सीचालक मुलीला पुन्हा भेटून तिची याबाबत मदत घेण्यास सांगतो. त्याप्रमाणे शेवटी खूप सार्‍या पैशांच्या मोबदल्यात तो तिला बोलण्यास तयार करतो. तो तिच्या घरी पोहचतो. इतक्यात त्या दोघांवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला होतो. यात ते दोघेही बचावतात, पण यामागे कोण आहे? हे रहस्य कायम राहते. दरम्यान नायिका हळूहळू नायकामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत जाते. आणि त्याची ओळख पुन्हा मिळवून देण्य़ाच्या कामात ती त्याच्या बरोबरीने सहभागी होते. इकडे त्याला मदत करणारा भूतपूर्व जर्मन गुप्तहेर कालांतराने खरं काय आहे? हे शोधून काढतो. पण त्याला काही सांगण्याआधीच एका प्रसंगात आत्महत्या करतो.

नायकाची पत्नी त्याच्याबरोबर असं का वागते? केवळ तीन दिवसांत कोणी कसं काय नायकाचं सबंध आयुष्य हिरावून घेऊ शकतं? आणि का? माणसं खोटं बोलू शकतात, पण प्रसंग? नायकाचा आपल्या पत्नीबरोबरचा फोटो! या फोटोमध्येही त्याच्या जागी दुसरी व्यक्ती कशी काय दिसू शकते? नायकाचे शास्त्रज्ञाशी फोनवर झालेले सर्व खाजगी बोलणे त्याची जागा घेतलेल्या व्यक्तिला अगदी जसेच्या तसे कसे काय माहित असते? या प्रश्नांमध्ये नायक जितका गोंधळून जातो, तितकेच प्रेक्षकही विचारात पडतात. शेवटी नायकाला पुन्हा स्वतःची ओळख प्राप्त होते का? या प्रश्नाचं उत्तर जाणण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पाहावा लागेल.